Friday, December 30, 2011

31 Dec Mobile 'ब्लॅकआऊट डे' तर काय सोशल नेटवर्किंग आहे ना



नववर्षाच्या शुभेच्छा संदेशासाठी प्रत्येकी पाच रुपये अतिरिक्‍त चार्ज आकारून ग्राहकांची लूट करण्याच्या मोबाईल कंपन्यांच्या योजनांना सोशल नेटवर्किंगमुळे चाप बसणार आहे. अनेक वेबसाईटस्‌नी मोबाईलवर मोफत शुभेच्छा संदेश पोहोचविण्याच्या स्पर्धेत उडी घेतली असून ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. साहजिकच "मोबाईल कंपन्या विरुद्ध सोशल नेटवर्किंग' असे शीतयुद्धच यानिमित्ताने रंगणार आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या कल्पना काळानुसार बदलत आहेत. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे, पोस्टाने आठ दिवसांपूर्वीच शुभेच्छा पत्र पाठविणे अथवा फोन व मोबाईलवरून शुभेच्छा देण्याचे दिवस आता ओसरू लागले असून हजारो मैल दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर वाढू लागला आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून थर्टी फर्स्टपासूनच शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होणार आहे.
मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून शुभेच्छांची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यांनीसुद्धा याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी असे दोन दिवस प्रत्येक एसएमएससाठी पाच रुपये चार्ज लागणार असल्याचे कळविले आहे. मोबाईलच्या वाढत्या फॅडमुळे काही ग्राहक एवढा मोठा भुर्दंड सहन करूनही शुभेच्छा संदेश पाठवीतच होते; परंतु आता www.waytosms.com, www.fullonsms.com आणि www.16dy2.com अशा काही साईटस्‌मुळे ग्राहकांना मोबाईल कंपन्यांनासुद्धा मात देणे शक्‍य झाले आहे. मोबाईल विरुद्ध सोशल नेटवर्किंग असे युद्धच जवळपास यानिमित्ताने सुरू झाले असून अनेक वेबसाईटस्‌वरून मोफत एसएमएस सेवा पुरविली जात आहेत.

नेटवरून एखाद्याला एसएमएस पाठविणे वेळखाऊ अन्‌ कधी कधी नेटवर्किंगमध्ये येणाऱ्या अडथळ्यामुळे काहीसे तापदायक असते; परंतु हव्या त्या व्यक्‍तीपर्यंत वेळेत संदेश न पोचताही मोबाईल कंपन्यांकडून मोबदला वसूल केला जात असल्याने त्रस्त असलेला ग्राहक त्याचा पर्याय निवडत आहे. सोशल नेटवर्किंगमुळे एकच शुभेच्छा मेसेज एका क्‍लीकवर हजारो मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचणार आहे. तोही कमीत कमी खर्चात किंवा कदाचित मोफतही.
अनेक वेबसाईटस्‌ तयार शुभेच्छा संदेशासह सज्ज झाल्या आहेत. मोबाईल कंपन्यांकडूनच ग्राहकांची यादी घेत अशा वेबसाईटस्‌नी ग्राहकांना आपल्या वेबसाईटचा पत्ता पाठविण्यास सुरुवात केली आहे. इंटरनेटवर त्यांचा सर्च केल्यावर काही क्षणातच जगभरातील तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवर तुमचा शुभेच्छा संदेश पोहोचवता येणार आहे.

वेबसाईटस्‌चा प्रचार मोबाईलवरूनच चार वर्षांपासून सोशल नेटवर्किंगचे जाळे झपाट्याने वाढत असून प्रत्येक टेक्‍नोसॅव्ही व्यक्ती त्यात खेचली जात आहे. ज्या मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांकडून अतिरिक्‍त नफा कमाविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याच कंपन्यांच्या नेटवर्किंगचा वापर करून वेबसाईटस्‌ ग्राहकांना जवळपास मोफत सेवा पुरवीत आपला प्रचार झपाट्याने करू लागल्या आहेत. "थर्टी फर्स्ट'ला काही तासच उरलेले असताना सोशल नेटवर्किंगवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होऊ लागला आहे. अशा वेबसाईटनेही ग्राहकांच्या सेवेसाठी अद्ययावत शुभेच्छा संदेशांचा भलामोठा खजिना उपलब्ध केला आहे.

No comments:

Post a Comment