Saturday, November 19, 2011

टीम 'सॉस' सडक्‍या कोहळ्यांच्या कारखान्यावर छापा

नागपूर - सडक्‍या कोहळ्यांपासून "सॉस' तयार करून तो टोमॅटो सॉस म्हणून भासवणाऱ्या कारखान्यावर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 15 लाखांचा माल जप्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना सुरू होता. पोलिीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत काहीच माहिती नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 

पारडीनजीकच्या बीडगाव भागात बनावट सॉस बनवण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलीसांना मिळाली होती. त्या आधारे पोलीसांनी या कारखान्याची गुप्त माहिती मिळविली. गुरूवारी या कारखान्याभोवती ग्रामीणच्या गुन्हे पथकाने जाळे पसरले. पथकातील काही सदस्यांना कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये सडके कोहळे दिसले. त्यांनी आत शिरताच त्यांना 14 जण कारखान्याच्या आत सॉस तयार करीत असल्याचे दिसले. आतील दृश्‍य अतिशय धक्कादायक होते. त्यात सडक्‍या कोहळ्यापासून टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस तयार केले जात होते. एवढेच नव्हे, तर ऍसिड आणि घातक रसायनांच्या मदतीने व्हिनेगर आणि नुडल्स तयार केले जात होते. हे दुर्गंधीयुक्त आणि घातक सॉस खरेखुरे वाटावे, यासाठी रंग तसेच गंधासाठी काही रसायने वापरली जात होती. पोलिसांनी छापा टाकताच तेथे एकच धावपळ उडाली. पोलिसांनी या कारखान्याला सील ठोकले.

सर्वकाही घातकच 
माहितीनुसार, नुडल्स निर्मिती करताना ऍसिडचा वापर करण्यात येतो. नागपूर शहरात असलेल्या अनेक चायनीज ठेल्यांवर हा सॉस सर्रासपणे वापरला जातो. याशिवाय, बार आणि हॉटेल्समध्येही या कारखान्यांमध्ये तयार झालेला सॉस वापरला जातो. सिन्हा टीम युनिव्हर्सल फूड प्रोसेसिंग या नावाने हा कारखाना चालविला जात होता. या भागातील ग्रामस्थांकडून कमी दरात व निकृष्ट दर्जाचे कोहळे खरेदी केले जात होते. ते एका मोठ्या कढईत शिजवून नंतर त्यावर प्रक्रिया करून सॉस तयार केला जात होता. रंग व रसायनांच्या अधिक वापरामुळे ते निकृष्ट दर्जाचे भासत नव्हते. धक्‍कादायक बाब म्हणजे या कारखान्यात रसायनांच्या तपासणीसाठी एक प्रयोगशाळाही आहे. या प्रयोगशाळेत किती रसायनांचा वापर करावा, हे निश्‍चित केले जात होते. रिकाम्या बाटलीत हा सॉस भरून त्यावर कंपनीचे लेबल लावून नंतर हा सॉस बाजारात विक्रीसाठी पाठविला जात होता. नागपूरसह राज्यातील अनेक भागांतही हा सॉस विक्रीस पाठविला जात होता. शेजारील राज्यांतूनही या सॉसला बऱ्यापैकी मागणी होती. कारखान्यातील सॉसचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले गेले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वात गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक राजन पाली, पोलिस उपनिरीक्षक अरविंद सराफ, एन. पी. इंगळे, यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली

Same News In English

1 comment: