Friday, January 20, 2012

कोस्टा कॉंकॉर्डिया(Costa Concordia) जहाजवारिल बचावलेले 17 भारतीय नागरिक मुंबई परतले

मुंबई - "कोस्टा कॉंकॉर्डिया' जहाजावर नेहमीप्रमाणे काम सुरू होते... तब्बल 4000 प्रवासी आणि 1100 "क्रू' सागरी सफरीचा आनंद घेत होते. अचानक "क्रुझ'ला जबरदस्त धक्का बसला... धावपळ सुरू झाली... जीवाचा थरकाप उडविणाऱ्या किंकाळ्या कानावर आल्या.... मी प्रचंड घाबरलो.... पण क्षणभरात सावरलो. जहाजावरील प्रवाशांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे होते. अन्य सहकाऱ्यांसह मी बचाव कार्यासाठी धाव घेतली. प्रवाशांना लाईफ बोटींमध्ये बसवून किनाऱ्यावर सुरक्षित पाठविण्याचे प्रयत्न सुरू केले. मी शेवटपर्यंत जहाजावर होतो. एका क्षणी जहाजातील केबिन माझ्या अंगावर कोसळणार होती; पण थोडक्‍यात बचावलो; तरीही पत्नी, जुळी मुले आणि कुटुंबीयांची पुन्हा भेट होईल असे वाटत नव्हते; पण मनाचा हिय्या केला आणि स्वतःला समुद्रात झोकून दिले आणि वाचलो; मात्र आपण जिवंत आहोत, यावर बराच वेळ विश्‍वासच बसत नव्हता... हजारोंच्या जीवावर बेतलेला हा प्रसंग ठाण्याच्या भरत पैठणकर यांनी सांगितला, तेव्हा उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला.
इटलीच्या समुद्रात गेल्या शुक्रवारी (ता. 13) बुडालेल्या "कोस्टा कॉंकॉर्डिया' या आलिशान जहाजावर मृत्यूला हुलकावणी देऊन बचावलेले 201 भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले आहेत. या क्रुझवर "बार टेंडर' म्हणून काम करणारे भरत पैठणकर आज 16 सहकाऱ्यांसह मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुंबई, ठाणे, वसई आणि उपनगरांत राहणाऱ्या या 17 जणांच्या स्वागतासाठी नातेवाईक, मित्रमंडळींनी विमानतळावर हार आणि पुष्पगुच्छ घेऊन गर्दी केली होती. त्या जहाज अपघातातून बचावलेल्या व्यक्तींना घेऊन सायंकाळी पावणेसहा वाजता "अमिराती एअरवेज'चे विमान रोम आणि दुबईमार्गे मुंबईत दाखल झाले. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर नातेवाईक आणि बचावलेल्यांची गळाभेट झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या वेळी अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले.

मूळचे नागपूरचे असलेले आणि गेल्या काही वर्षांपासून कळवा येथे राहणारे भरत पैठणकर गेली 10 वर्षे जहाजावर काम करीत आहेत. "कोस्टा कॉंकॉर्डिया' जहाजावर कोसळलेल्या त्या संकटाचा अनुभव त्यांनी सांगितला. ""मी पाण्यात उडी मारल्यावर लाईफ बोटीतील लोकांनी मला खेचून घेतले. किनाऱ्यावर आल्यानंतरही मनातली भीती कायम होती. मी 24 तास अक्षरशः रडून काढले. त्या जीवघेण्या अपघातातून बचावल्याचेच मला आश्‍चर्य वाटते. आता पुन्हा क्रुझवर काम करण्याचा विचार नाही. कुटुंबीयांसोबतच राहणार'', असे पैठणकर सांगत होते. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी त्रिशा आणि तनुष या दोन लहानग्यांसह पत्नी नर्मदा हजर होत्या. त्रिशा त्यांना बिलगली, तर नर्मदा यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा प्रसंग पाहून उपस्थितांची मने हेलावली.

पैठणकर यांच्यासह विमानातून मायदेशी परतलेले राहुल राघव, पॅट्रिक पिंटो, मोबिन शेख, राजेश कोलासा, रमेश पटेल, महेश सामंता यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार विमानतळावर हार-तुरे घेऊन हजर होता. अपघातग्रस्त क्रुझच्या कॅप्टनने पळ काढल्याबद्दल संताप व्यक्त केला जात होता.

तो नक्कीच परत येईल
"कोस्टा कॉंकॉर्डिया' जहाजावरील एकमेव बेपत्ता असलेल्या रसेल रिबेलोचे नातेवाईकही विमानतळावर आले होते. रसेलचा शोध अद्याप सुरू आहे; त्याला पोहता येत नव्हते. कर्तव्य बजावताना त्याने क्रुझवरील शक्‍य तितक्‍या प्रवाशांना लाईफ जॅकेटचा पुरवठा केला; मात्र त्याने लाईफ जॅकेट घातले नव्हते. ""शेवटचा अर्धा तास तो माझ्यासोबत होता; इतरांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत होता. तो अचानक बेपत्ता झाल्याचे अतीव दु:ख वाटते. रसेल नक्कीच परत येईल. आम्ही त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करीत आहोत'', असे त्याचा मित्र राहुल राघव म्हणाला. आपल्या मुलाला पुन्हा कधीच जहाजावर पाठविणार नाही, असे राहुलचे वडील आणि माजी नौदल अधिकारी सतीश राघव यांनी सांगितले. त्या जहाजावरील अन्य भारतीय उद्या (ता. 20) पहाटे मुंबईत दाखल होणार आहेत.

जीवात जीव आला...
""मम्मी जहाज बुडतेय... पूर्ण कलंडले आहे'', असे पॅट्रिकने फोनवर सांगितले आणि आमचे हातपाय गळून गेले. नक्की काय करावे ते सुचत नव्हते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. शनिवारची रात्र आम्ही पती-पत्नींनी जागून काढली. पॅट्रिक सुखरूप असल्याचा फोन दुसऱ्या दिवशी सकाळी आला, तेव्हा जीवात जीव आला; मात्र त्याला पाहण्यासाठी जीव कासावीस झाला होता... पॅट्रिक पिंटोच्या आई अजवूल पिंटो सांगत होत्या. तो सुखरूप परत आला हे माझ्यासाठी मोठे "गिफ्ट' आहे, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. ""आता तो सुखरूप आला आहे. त्याला "इटालियन फूड' आवडत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आज पोळी आणि मेथीची भाजी असा त्याचा आवडता जेवणाचा बेत केला आहे'', असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment