Wednesday, January 11, 2012

महापालिका आयुक्तांचा निर्णय 17 फेब्रुवारीलाच मुंबईत निकाल

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मतमोजणी 17 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता सुरू होईल.

मुंबई महापालिकेची निवडणूक 16 फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करावा, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मात्र त्याबाबत महापालिकेने सुरुवातीपासूनच नकारघंटा वाजवली होती. महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत मतमोजणी आणि निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे.

मुंबईतील मढ, मार्वे आणि गोराई या बेटांवर 38 मतदान केंद्रे असून तेथून मतदान यंत्रे नौकांतून मतमोजणी केंद्रावर आणावी लागतात. ही नौकासेवा समुद्राच्या भरती-ओहोटीवर अवलंबून असते. त्यामुळे मतदान यंत्रे वेळेत न पोहोचण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे निवडणूक कर्मचाऱ्यांवर पडणारा ताण लक्षात घेऊन निकाल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

No comments:

Post a Comment