Friday, January 20, 2012

कॉपीचे प्रकार बदलले... आणि शिक्षाही

मुंबई - जसजसे विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनाचे विविध टप्पे गाठत आहे, तसा त्या संशोधनाचा उपयोग चांगल्या गोष्टींसह वाईट गोष्टींसाठी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. नुकतेच देशातल्या एका स्पर्धा परीक्षेत चार विद्यार्थ्यांना मोबाईल ब्ल्यू टूथच्या साह्याने कॉपी करताना पकडण्यात आले होते. एसएससी बोर्डही या विविध बदलांकडे पाहत आहे. त्यामुळे कॉपी करण्याच्या पद्घतींबरोबरच शिक्षा करण्याच्या पद्घतीतही बदल करण्याचे भान आलेल्या बोर्डाने नवी "शिक्षा सूची' जाहीर केली आहे. यापूर्वीची शिक्षासूची 1994 सालची होती. आता कॉपीबहाद्दरांना शिक्षा कोणत्या असू शकतात, याचे सूतोवाच करीत शिक्षक, पालक आणि अन्य संबंधित घटकांकडून याबाबत सूचनाही मागविण्यात आल्या आहेत.

कॉपीसाठी विद्यार्थ्यांना होऊ शकणाऱ्या शिक्षा अशा-
अर्ज भरण्यापूर्वी-
1. दहावी, बारावी परीक्षेचा अर्ज भरताना खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास आतापर्यंत केवळ परीक्षेस बसता येत नव्हते. शिवाय त्या मंडळासह राज्यातल्या अन्य कोणत्याही विभागीय मंडळातून त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नसे, पण आता यासह त्या विद्यार्थ्यांना 17 क्र.चा अर्ज भरून खासगीरीत्याही परीक्षेस बसता येणार नाही.

2. अर्ज भरताना चूक झाल्यास विद्यार्थ्याला आधी केवळ समज दिली जात होती. यापुढे मात्र चुकीच्या अर्जासाठी दंड आकारण्यात येईल.
प्रात्यक्षिक परीक्षा
1. प्रात्यक्षिक परीक्षेत कॉपी करताना पकडल्यास यापुढे तो विद्यार्थी त्या परीक्षेत गैरहजर गणला जाईल; मात्र प्रात्यक्षिक परीक्षेत तोतया विद्यार्थी आढळल्यास मूळ विद्यार्थ्याला आधी केवळ त्या परीक्षेस बसता येत नसे, यापुढे पुढील पाच वर्षे त्या विषयाच्या परीक्षेस बसता येणार नाही.

लेखी परीक्षा
1. परीक्षा केंद्रात परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी आपापसात बोलताना आढळले तरीही शून्य गुण देण्याची तरतूद या शिक्षा सूचीत आहे.
2. विद्यार्थी कॉपी करूनही सहीसलामत सुटला; मात्र त्याच्या कॉपीची एखादी चीट तपासनिसाला उत्तरपत्रिका तपासत असताना आढळली तरी त्या विद्यार्थ्याला शून्य गुण देण्यात येतील.

शिक्षकांना होऊ शकणाऱ्या शिक्षा
1. शिक्षकाने वेळेपूर्वी प्रश्‍नपत्रिका वाटली तर आधी केवळ त्या शिक्षकाचा पर्यवेक्षक म्हणून मिळणारा मोबदला रद्द होत असे, यापुढे मात्र अशा शिक्षकाची खातेनिहाय चौकशी होऊन दोन वेतनवाढी थांबणार आहेत.
2. जर पेपर तपासणीसाठी शाळेकडून पात्रता नसलेला शिक्षक आल्याचे उघडकीस आले, तर आतापर्यंत केवळ त्या शिक्षकाला त्या पेपर तपासणीचा मोबदला मिळत नसे; मात्र यापुढे त्या शिक्षकाची वेतनवाढही रद्द करण्यात येणार आहे.

शाळांना होऊ शकणाऱ्या शिक्षा
1. बोर्डाने केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या शाळांवर महाराष्ट्र खासगी शाळा सेवाशर्ती नियमावली 1981 नुसार कारवाई करून त्या शाळांच्या मंडळमान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव बोर्ड देऊ शकते.

No comments:

Post a Comment